प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय व शाळेत वेधशाळा
कोणतीही संकल्पना ही कानांनी ऐकून, डोळ्यांनी पाहून समजते त्यापेक्षाही प्रत्यक्ष कृती किंवा सहभागातून सर्वात चांगली समजते. या मूलभूत तत्वावर आधारित शेतकरी व शालेय विद्यार्थ्यांना हवामानासंबंधीचे प्राथमिक ज्ञान अवगत करून देण्याच्या उद्देशाने दैनंदिन हवामानासंबंधी माहिती त्यात होणारे दैनंदिन आणि नैमित्तिक बदल यांची निरीक्षण व नोंदी कृतींद्वारे शालेय विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी प्रत्येक शाळेत हवामान केंद्र अशी योजना; विज्ञान भारती, पुणे द्वारा "प्रयोगातून विज्ञान प्रशिक्षण" या प्रकल्पा अंतर्गत आम्ही तयार केली. भारत हा कृषी प्रधान देश आहे व ग्रामीण भागातील बहुतेक विद्यार्थी शेतकऱ्यांची अपत्ये आहेत. देशातील शेतकरी असावा तितका हवामान साक्षर नाही त्यामुळे घरातील शाळकरी मुलांना हवामान साक्षर केले तर ते आपल्या पालकांना हवामान बदलाची अचूक माहिती देऊ शकतील या संकल्पनेतून प्रत्येक शाळेत हवामान केंद्र संकल्पनेचा उदय झाला महाराष्ट्रात सध्या आठ हवामान केंद्र कार्यरत आहेत व त्यांचे अनुभव सकारात्मक आहेत. पालक व विद्यार्थी वारंवार मोबाइलवार येणाऱ्या माहिती वर लक्ष ठेऊन असतात व त्यावर चर्चा करतात. विद्यार्थी व शेतकरी सयंत्रा वर पावसाची मोजदात करतात व नोंदी ठेवतात. विद्यार्थ्यांना बरोबर संवाद साधला असता त्यांना हवामान संबंधित सर्व घटक माहित असल्याचे जाणवते. सुमारे वर्षभराच्या नोंदी ठेवल्यावर त्यांना अंदाज बांधणे सोपे जाणार आहे. स्वयंचलित हवामान केंद्राचा नोंदी आपोआप साठविल्या जातात त्यामुळे साठलेल्या नोंदी केंव्हाही पाहता येतात. सरकारी शेतकी अधिकारी हवामान संबंधी माहिती वारंवार घेतात या हवामान केंद्रामुळे हवामानात वेळोवेळी होणारे तात्कालिक बदल, त्यांची कारणे याबाबतची माहिती शालेय विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना त्यांनीच नियमितपणे केलेल्या निरीक्षण व नोंदींच्या सहाय्याने मिळते व निष्कर्ष काढण्याची सवयही त्यांना लागते. स्थानिक पातळीवरील शेतकर्यांनासुद्धा या प्रकल्पाच्या कार्यवाहीनंतर वादळे, हवामानात वेगाने होणारे बदल, वादळे,पर्जन्य इ.ची माहिती मिळून काही वेळा होणारे नुकसान टाळता येऊ शकते. हे हवामान केंद्र स्वनियंत्रित व सौर उर्जेवर चालणारे आहे आणि त्याच्या संकेत स्थळावरुन सर्व हवामान विषयक माहिती इंटरनेटद्वारा मोबाईल फोनवर जगात कोठूनही पाहता येईल. "प्रत्येक शाळेत वेधशाळा" योजनेचा शुभारंभ रविवार दि. १९ सप्टेंबर २०२१ रोजी कोकण किनारपट्टीवरील ग्राममंगल मुक्तशाळा, डहाणू या आदिवासी भागातील शाळेपासून झाला. येथे प्रामुख्याने स्वयंचलित आणि हाताने नोंदी घेणारे असे दोन प्रकारचे हवामान केंद्र बसविण्यात आले आहेत. तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दिशा, पावसाची तिव्रता, एकंदर पडलेला पाऊस, वाऱ्याची सतत दिशा बदलणे, जाणवणारे तापमान यांचे सेन्सर या यंत्रात बसविलेले आहेत. साधारण दर दहा सेकंदाने त्याची माहिती अद्ययावत होते. हाताने नोंदी घेणाऱ्या यंत्रामध्ये पर्जन्यमापन ठेवलेले आहे. सकाळी साडे आठ वाजता व संध्याकाळी साडे पाच वाजता ह्या नोंदी विद्यार्थी घेणार आहेत. पूर परिस्थिती व आपत्ती व्यवस्थापनासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. स्वयंचलित केंद्र तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दिशा, पावसाची तिव्रता, एकंदर पडलेला पाऊस, वाऱ्याची सतत दिशा बदलणे, जाणवणारे तापमान यांचे सेन्सर बसविलेले आहेत. साधारण दर दहा सेकंदाने त्याची माहिती अद्ययावत होते. पुणे वेधशाळेचे माजी हवामान तज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनीही याबाबत मार्गदर्शन केले आहे. सर्व विद्यार्थी हवामान दूत बनावेत यासाठी हवामानाच्या चळवळीची सुरूवात शाळेपासून होण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना माहिती देण्याकरिता इंटरनेट हवामान केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याद्वारे हवामानाची माहिती सगळ्यांना सहजरित्या उपलब्ध होणार आहे. "प्रत्येक शाळेत वेधशाळा"